माझं गाव माझं शहर | परंडा (दि. २० एप्रिल) : तालुक्यातील आवार पिंपरी येथील उल्फा नदीवरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली असून, पुलावरील तुटलेल्या रेलिंगची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, परंडा ते कुर्डुवाडी हा मुख्य मार्ग या पुलावरून जात असल्याने येथे २४ तास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या पुलाला विशेष महत्त्व आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात उल्फा नदीला आलेल्या महापुरात पुलावरील दोन्ही बाजूंचे लोखंडी रेलिंग व आडवे पाईप वाहून गेले असून काही ठिकाणी चोरीही झाल्याचे समोर आले आहे.
सध्या पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही संरक्षण कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगात येणारी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाळ्यात नदीला वारंवार पूर येत असल्याने अचानक पाण्याची पातळी वाढल्यास अपघाताची शक्यता अधिक तीव्र होते.
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन येत्या ८ दिवसांत पुलावरील रेलिंगची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, निश्चित मुदतीत काम सुरू न झाल्यास १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ‘धडक हलगी नाद आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा आवार पिंपरी ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर दादासाहेब पाडुळे, उत्तम ओव्हाळ, अतुल नरुटे, उत्रेश्वर गुडे, योगेश नरुटे, बालाजी नरुटे, राजाराम मासाळ, भैरवनाथ जाधव, विलास घोडके, अप्पासाहेब मारकड, सोमा घोडके, सतीश डाकवाले, विठ्ठल जाधव, तुषार जाधव आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
