परंडा | प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला अखेर यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर खुर्द येथील खून प्रकरणाची नोंद 10 जून 2026 रोजी आंबी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. घटनेनंतर मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा फरार झाला होता. तो कर्नाटकातील बसवकल्याण येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पोलीस अधीक्षक ऋतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इप्परवार यांनी विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. पथकाने बसवकल्याण येथे पोहोचून तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी दीपक गरड याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने आणि ‘फिल्मी स्टाईल’ पाठलाग करून त्याला जेरबंद केले. अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंधी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक
या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक ऋतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इप्परवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जगताप, नितीन जाधव, बबन जाधव तसेच चालक पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने पार पाडली.
खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या काही दिवसांत अटक करण्यात आल्याने तपासाला गती मिळाली असून पुढील तपास आंबी पोलीस ठाणे करीत आहे.
