अस्थी विसर्जनाऐवजी आंब्याचे झाड लावून तांबे बंधूंचा आदर्श उपक्रम

परंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. महादेव बळीराम तांबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी विसर्जन न करता शेतात पुरून त्यावर केशर जातीच्या आंब्याचे रोप लावले. या अभिनव निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

कै. महादेव बळीराम तांबे यांचे बुधवार, दि. 10 जून रोजी सायंकाळी निधन झाले होते. शुक्रवार, दि. 12 जून रोजी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र पोलिस पाटील रविंद्र तांबे, माजी सरपंच शहाजी तांबे, शिक्षक दीपक तांबे, धोडींबा तांबे, बापू तांबे, गौतम तांबे, बाळू तांबे, सहदेव तांबे, पांडुरंग तांबे, वाल्मीक तांबे, कल्याण तांबे आदी तांबे बंधूंनी एकमताने अस्थी पाण्यात विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबीयांनी घराजवळील शेतामध्ये अस्थी पुरून त्यावर केशर आंब्याचे रोप लावले. या कृतीमागे दिवंगत महादेव तांबे यांची शेती आणि वृक्षप्रेमाची आवड असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

याबाबत बोलताना पोलिस पाटील रविंद्र तांबे म्हणाले, “आमच्या वडिलांना शेती आणि झाडांची खूप आवड होती. पाणी प्रदूषित करण्यापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावल्यास त्यांची आठवण कायम राहील. भविष्यात अनेक पिढ्यांना या झाडाची फळे मिळतील. आमचे वडील या आंब्याच्या झाडाच्या रूपाने सदैव आमच्यात जिवंत राहतील, अशी आमची श्रद्धा आहे.”

अस्थी विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण टाळून वृक्षारोपणाचा पर्याय स्वीकारण्याचा तांबे बंधूंचा निर्णय सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा ठरेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!