माझं गांव माझं गांव(प्रतिनिधी) परंडा:बाजारपेठेत कांदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला हमीभाव आणि त्वरित योग्य अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी ‘छावा’ संघटना आणि परंडा तालुक्यातील सकल शेतकऱ्यांच्या वतीने येत्या २८ मे २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर परंडा-करमाळा रोडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भातील गंभीर इशारा देणारे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांना उद्देशून दिलेल्या या निवेदनात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. त्यातच आता कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. बी-बियाणे आणि खतांचे दर गगनाला भिडले असतानाही, चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक घेतले. मात्र, बाजारात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील काही शेतकरी मानसिक तणावातून आपला कांदा जाळून टाकत आहेत, ही अत्यंत बिकट व चिंताजनक परिस्थिती असल्याचे निवेदनात म्हटले आहे
यांना देण्यात आले निवेदन:हे निवेदन माहिती व योग्य कारवाईसाठी राज्याचे कृषी मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, धाराशिवचे जिल्हाधिकारी, परंडा तालुक्याचे तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, धाराशिव), सहाय्यक निबंधक (परंडा), कृषी उत्पन्न बाजार समिती (परंडा) आणि परंडा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.
आंदोलन प्रसंगी उपस्थित पदाधिकारी:निवेदन देताना छावा संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश नारायण जेधे, तालुका अध्यक्ष सुधीर लटके, माजी सरपंच पंडीत जगदाळे, शहर उपाध्यक्ष हरिभाऊ आदमीले, संतोष गरड, श्रीमंत गरड, पांडुरंग गरड, बापू धनवे, सुनील सातपुते, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर गाडवे, फकिरा सुरवसे, गजानन सुरवसे, संदिप गरड, देविदास गरड, कालिदास गरड, शंकर सुकले, धनंजय गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, शहाजी कुदळे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
