परंडा | प्रतिनिधी
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांनी परंडा येथील विश्वसिद्धी कॉम्प्लेक्स येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे मतदारसंघातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीदरम्यान आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची दिशा, मतदारांशी संपर्क मोहीम तसेच महाविकास आघाडीच्या निवडणूक रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. परंड्यातील विश्वसिद्धी कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या बैठकीत आघाडीतील विविध घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
महेश देशमुख यांच्या स्वागतासाठी तसेच निवडणुकीसंदर्भातील नियोजनासाठी आयोजित बैठकीस युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रेवण ढोरे, नगरसेवक अनिल शिंदे, इस्माईल कुरेशी, रमेश परदेशी, मन्नान बासले, अब्बास मुजावर, मजहर दहेलूज, आकिब पठाण, सत्तार पठाण, सोमनाथ अलबत्ते यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंड्यात झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून आगामी काळात महाविकास आघाडीची निवडणूक मोहीम अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने राबविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
