परंड्यात 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा | प्रतिनिधी

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 1 लाख 88 हजार 508 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा व मावा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून 2026 रोजी सकाळी 11.15 ते सायंकाळी 5.15 वाजेदरम्यान बावची चौक परिसरातील आरोपींच्या मालकीच्या तीन गोदामांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

या प्रकरणी रोहित दिनेश फंदी (वय 26), अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान खुळे व प्रदीप खुळे (दोघे रा. परंडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून मानवाच्या आरोग्यास हानीकारक असल्याची जाणीव असतानाही विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा व मावा यांचा मोठा साठा बेकायदेशीररित्या ठेवला होता.

या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट करीत आहेत.

सदर गुन्ह्याची नोंद 6 जून 2026 रोजी पहाटे 12.07 वाजता परंडा पोलिस ठाण्यात करण्यात आली. परंडा तालुक्यातील गुटखा माफियांविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!