परंडा | माझं गाव माझं शहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परंडा तालुक्याने यंदा ९२.६० टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्यातील ४० विद्यालयांमधून १८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७८५ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. यामधून १६५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाही मुलींनीच उज्ज्वल यश मिळवत बाजी मारली आहे. तालुक्यात परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ८०३ मुलींपैकी ७७६ मुली उत्तीर्ण झाल्या, तर ९८२ मुलांपैकी ८७७ मुले उत्तीर्ण झाली आहेत. गुणवत्तेच्या यादीत ५२७ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून प्रथम श्रेणीत ५७५, द्वितीय श्रेणीत ४२० तर पास श्रेणीत १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
९ शाळांचा शंभर टक्के निकाल
तालुक्यातील ९ शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये संत मिरा पब्लिक स्कूल परंडा, डोंजे विद्यालय डोंजे, राजश्री शिवछत्रपती विद्यालय वाकडी, भैरवनाथ विद्यालय कंडारी, कल्याणी माध्यमिक विद्यालय कुक्कडगाव, ग्लोबल विद्यालय खानापूर परंडा, विजयसिंह विद्यालय चिंचपूर (बु.), बजरंग विद्यालय आरणगाव आणि खंडेश्वर विद्यालय परंडा या शाळांचा समावेश आहे.
विविध शाळांचा निकाल
महात्मा गांधी विद्यालय परंडा – ८२.९८%, प्रेरणा हायस्कूल परंडा – ६८.६२%, कल्याणराव भातलवंडे विद्यालय कपिलापुरी – ८८.८८%, जिल्हा परिषद हायस्कूल जवळा (नि.) – ९०%, चांदणी विद्यालय आसू – ८१.२५%, न्यू हायस्कूल अनाळा – ९२.१०%, प्रतिभा पवार हायस्कूल जवळा (नि.) – ७५%, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय कुंभेफळ – ९४.२८%, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव – ९७.२९%, बावची विद्यालय परंडा – ९७.८१%, संभाजीराजे विद्यालय दहिटणा – ९७.४३%, सिद्धार्थ विद्यालय अंदोरा – ८५.७१%, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा – ९८.३८%, जिल्हा परिषद मुलींची शाळा परंडा – ९०.९०%, जिल्हा परिषद हायस्कूल सोनारी – ९६.४२%, जय हनुमान विद्यालय वाटेफळ – ९८.२७%, श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी – ९७.६१% आदी शाळांनी उल्लेखनीय यश मिळवले.
जिल्ह्याचाही निकाल उल्लेखनीय :
धाराशिव जिल्ह्याचा एकूण दहावीचा निकाल ९१.२९ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ११ हजार ८५० मुलांपैकी १० हजार ४६४ मुले तर ९ हजार ८४३ मुलींपैकी ९३४० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यासह परंडा तालुक्यातही मुलींनी यंदा सरस कामगिरी केली आहे.
