कुंभेफळ येथील दलित वस्तीच्या विकास निधीवर डल्ला? चौकशीचे आदेश

परंडा | प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी एस. ए. कोटे यांना दिले आहेत.

तक्रारीनुसार, कुंभेफळ गावातील किशोर गायकवाड यांनी दि. २५ मे २०२६ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व पाण्याच्या टाकी दुरुस्तीच्या कामांसाठी अनुक्रमे सुमारे ४८ हजार २८७ रुपये आणि ९२ हजार २५० रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात दलित वस्तीत कोणतीही विकासकामे झालेली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी संबंधित कामे केवळ कागदोपत्री दाखवून शासनाचा निधी अपहार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दलित वस्तीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला निधी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणात ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित सदस्यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

दरम्यान, गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विस्तार अधिकारी एस. ए. कोटे यांना चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या चौकशीतून नेमके वास्तव काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!