परंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, धाराशिव जिल्हाधिकारी, महावितरणचे मुख्य अभियंता (लातूर परिमंडळ), उपकार्यकारी अभियंता (परंडा) तसेच तहसीलदार परंडा यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, परंडा तालुक्यात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतीपिके, फळबागा, शेतातील शेड तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब व विद्युत तारा कोसळल्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
नुकसानग्रस्त भागाचे महसूल, कृषी व संबंधित विभागामार्फत तातडीने संयुक्त पंचनामे करावेत.
शेतकरी, फळबागधारक व नागरिकांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी.
पडलेले वीज खांब उभे करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा.
रस्त्यांवर पडलेली झाडे व इतर अडथळे हटवून वाहतूक सुरळीत करावी.
आधीच विविध आर्थिक अडचणींचा सामना करणारा शेतकरी वर्ग या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे हवालदिल झाला असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे फारूख शेख, धनंजय गोफणे, विजय मेहर, कुलदीप देशमुख, अमित आगरकर, जमेल शिकलकर, कानिफनाथ सरपणे आणि अलीम शिकलकर यांच्या सह्या आहेत.
“नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक मदत मिळावी,” अशी अपेक्षा महासंघाने प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.
