येरमाळ्यात एलसीबीची धडक कारवाई; ६२ लाखांचा अवैध गुटखा जप्त

माझं गांव माझं शहर | धाराशिव

येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील वडजी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी येरमाळा येथे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

वडजी शिवारातील डोंगर परिसरातील तलावाजवळ एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्रीने झाकून गुटख्याची पोती लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित असलेल्या सात ते आठ जणांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून छगन बिसराम शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ताडपत्रीखाली अवैध गुटखा असल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी ताडपत्री हटवून पाहणी केली असता विविध पोत्यांमध्ये ‘राजनिवास’ गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. यासह आरोपींच्या तीन मोटारसायकली असा एकूण ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, महेबुब अरब, रोहित दंडनाईक आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

error: Content is protected !!