माझं गांव माझं शहर,परंडा / प्रतिनिधी
सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथील मुख्याध्यापक श्री एन. एम. गांधले यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित निरोप व सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता विजयकुमार वाघमारे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून हिमालय वाघमारे, किशोर वाघमारे, पार्थ गांधले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशालेचे संस्थापक कै. विजयकुमार वाघमारे (सर) यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गांधले सर यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रेमाची भेट म्हणून संपूर्ण कपड्यांचा आहेर देण्यात आला.
कार्यक्रमात हिमालय वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना श्री गांधले सर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री गोरे सर, श्री पटेल सर, श्री शेख सर तसेच किशोर वाघमारे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री गांधले सर यांनी शाळेतील सेवाकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देत सहकारी शिक्षक, विद्यार्थी व संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मनोगतामुळे उपस्थित वातावरण भावुक झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुंढे सर यांनी केले. अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात हा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला.
