जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली; ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर धडक कारवाई

परंडा (माझं गांव माझं शहर)

परंडा तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर माहिती अधिकार महासंघ, परंडा यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची अखेर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. तालुक्यातील विविध ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची अचानक तपासणी करण्यात आल्याने सेवा केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नायब तहसीलदार पूजा गोरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने केंद्रांवर धडक देत शुल्क आकारणी, डिजिटल पेमेंट व्यवस्था, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, नोंदी व व्यवहारांची सखोल चौकशी केली. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन, अपूर्ण माहिती आणि नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याची चर्चा आहे.

महासंघाच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे!

माहिती अधिकार महासंघाने सेवा केंद्रांमधील कथित अनियमितता, अतिरिक्त शुल्क व नागरिकांची होणारी गैरसोय याबाबत आवाज उठविला होता. या तक्रारीनंतरच जिल्हा प्रशासनाने गंभीर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.

चुका आढळल्यास कठोर कारवाई”

तपासणीत दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर शासकीय नियमानुसार कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.

नागरिकांमध्ये समाधान

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तक्रारींवर अखेर प्रशासनाने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सेवा केंद्रांतील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“माहिती अधिकार महासंघाच्या पाठपुराव्याला यश; आता दोषींवर कारवाई होणार का?” हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 

error: Content is protected !!