अधिकृत केंद्रांमार्फतच सेवा उपलब्ध करून द्या; विद्यार्थी व पालकांचा संताप
परंडा | प्रतिनिधी
जून महिना सुरू होताच शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून विविध शासकीय कागदपत्रांसाठी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची तहसील कार्यालय तसेच आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये मोठी गर्दी होत आहे. उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रिमिलेयर यांसारख्या प्रमाणपत्रांची मागणी वाढल्याने सेवा केंद्रांवर ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी अधिकृत परवानगी नसताना काही बेकायदेशीर सेवा केंद्रे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या केंद्रांमधून शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
शासनाने नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृत ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ मान्यता दिली आहे. मात्र, अनधिकृत केंद्रांमुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. प्रमाणपत्रे लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देत अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य विद्यार्थी, पालक आणि शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेली सेवा केंद्रे तात्काळ बंद करून अधिकृत केंद्रांमार्फतच सेवा उपलब्ध करून द्याव्यात तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
