परंडा, दि. ३ (माझं गांव माझं शहर): परंडा शहरात काही अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली असून, आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबत वाढत्या मागण्या लक्षात घेऊन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी दिनांक ८ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.
या सभेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, टिपू सुलतान चौक, महात्मा फुले चौक, महाराणा प्रताप चौक, निळा झेंडा चौक आदी ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारण्यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः अशा पुतळ्यांसाठी आवश्यक असलेले कायदेशीर स्वरूप, तसेच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे.
नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी सांगितले की, शहरात विविध ठिकाणी पुतळे उभारण्याच्या मागण्या सातत्याने येत असल्याने हा विषय नियोजनबद्ध आणि कायदेशीर पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, अनधिकृत पुतळा उभारण्याच्या घटनेमुळे शहरात चर्चा रंगली असून, आगामी सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.