कुंभेजा,परंडा येथे माजी सैनिकाच्या घरी दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद

📰 माझं गाव माझं शहर | धाराशिव (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील कुंभेज परिसरात माजी सैनिकाच्या घरी झालेल्या दरोड्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

२४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कुंभेज येथील माजी सैनिक विश्वास जगताप यांच्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी घुसून त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास करून आरोपी फरार झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जतवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान विविध तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलींचा समावेश आहे.

तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनी आधी परिसराची पाहणी करून नियोजनपूर्वक दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विविध गावांतील तरुणांचा समावेश असून, पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक,रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे व परंडा पोलीस ठाणे निरीक्षक आसाराम चोरमोले यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!