परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करा, अन्यथा आपल्या खुर्च्या रिकाम्या करा,” अशी आक्रमक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महासंघाने थेट मा.मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, धाराशिवचे जिल्हाधिकारी, लातूरचे मुख्य अभियंता, परंड्याचे तहसीलदार आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन पाठवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महावितरणचे काम फक्त वसुली आणि स्मार्ट मीटर पुरतेच?नागरिकांनी दिलेल्या निवेदनात महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परंडा शहरात दिवसेंदिवस वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या समस्येबाबत जेव्हा जागरूक नागरिक किंवा व्यापारी महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना फोन करतात, तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा फोन उचललेच जात नाहीत. “महावितरणचे काम फक्त वीज बिल वसुली करणे आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय ‘स्मार्ट मीटर’ बसवणे एवढेच उरले आहे का?” असा संतप्त सवाल महासंघाने केला आहे.निष्काळजीपणामुळे नागरिक आणि व्यापारी हैराण शहरात विजेचे मेंटेनन्स वेळेवर केले जात नाही. वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाझुडपांची छाटणी केली जात नाही. साधा फ्यूज गेला तरी तो बसवण्यासाठी दोन-दोन तास वाट पाहावी लागते. महावितरणच्या या ढिसाळ आणि हलगर्जीपणामुळे परंड्यातील सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि विशेषतः व्यापारी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.
दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा महासंघाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये. तसेच पुढील दोन दिवसांत शहरातील विजेचा लपंडाव पूर्णपणे बंद होऊन वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्व जबाबदारी महावितरण प्रशासन आणि तहसील प्रशासनाची राहील, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर फारूक शेख, कानिफनाथ सरपने, फारूक मुलानी, अमित आगरकर, विजय मेहर, धनंजय गोफणे, जमीर शिकलकर, आलिम शिकलकर, असलम पल्ला, शिवाजी करळे, किशोर येवारे, कुलदीप देशमुख, संदीप शिंदे, रावसाहेब खरसडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
