खानापूर येथील तरुणाच्या मृतदेहाची चार तास फरफट; आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप

परंडा,माझं गांव माझं शहर प्रतिनिधी : परंडा तालुक्यातील खानापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तब्बल चार तास फरफट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे आणि जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

खानापूर येथील चैतन्य विकास गटकुळ (वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, संबंधित गाव हे आनाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे कारण पुढे करत डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे मृतदेहासह नातेवाईकांना चार तास हेलपाटे मारावे लागले.

मृतदेह पडून, अधिकारी बैठकीत

एकीकडे मृतदेह रुग्णालयात पडून असताना दुसरीकडे संबंधित अधिकारी बैठकीत असल्याचे कारण देत आरोग्य यंत्रणा जबाबदारी टाळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सीमारेषांच्या गोंधळामुळे नागरिक त्रस्त

परंडा शहरालगत असलेल्या खानापूर व जामगाव या गावांतील नागरिकांना प्रशासनाच्या कार्यक्षेत्राच्या सीमारेषांमुळे वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. गाव परंड्याजवळ असले तरी आरोग्य सेवा मात्र दूरच्या केंद्रांशी जोडल्याने जिवंतपणी उपचारांसाठी आणि मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठीही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हस्तक्षेपानंतर प्रशासन जागे

या प्रकरणात भाजपचे नेते सुबोधसिंह ठाकूर यांनी थेट हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतरच आरोग्य प्रशासनाने हालचाल करत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.

नागरिकांचा सवाल

या घटनेनंतर खानापूर व जामगावसारख्या परंडा शहरालगतच्या गावांसाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. केवळ प्रशासकीय कार्यक्षेत्राच्या कारणास्तव मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!