माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी
परंडा तहसील कार्यालयामार्फत २०२७ च्या जनगणना प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून जनगणना कामासाठी आवश्यक साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) साहित्य वितरण करण्यात आले.
देशातील १६ वी भारतीय जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असून प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी व घरगणना’ या कामाला प्राधान्य दिले आहे. जनगणना प्रक्रियेसाठी तालुक्यातील प्रगणक, पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी (परि.) श्री. पाटील, नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर, नायब तहसीलदार पूजा गोरे, नायब तहसीलदार नितीन परळे तसेच जनगणना पर्यवेक्षक व नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे, घरांची स्थिती व उपलब्ध सुविधांची माहिती गोळा केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार असून त्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून प्रगणक व पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून माहिती संकलन अधिक अचूक व जलद करण्यावर भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घराचे स्वरूप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज, शौचालय, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन तसेच कुटुंबाकडे असलेली साधनसामग्री याबाबत माहिती घेतली जाणार आहे.
तालुक्यातून २६५ प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
देशाच्या विकासासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
