परंडा (दि.७ नोव्हेंबर )संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर परंडा तालुका सकल मराठा समाज संतप्त झाला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी,अशी मागणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की”माध्यमां मधून समोर आलेल्या बातमीनुसार मनोज दादा जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचला गेल्याचे समजते. ही माहिती ऐकून संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे.मनोज दादा हे केवळ व्यक्ती नाहीत,तर न्याय, समानता आणि हक्क यासाठी लढणारा आवाज आहेत.”
मराठा समाज बांधवांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे जोपर्यंत आमचा श्वास आहे,तोपर्यंत मनोज दादा एकटे नाहीत.
त्यांना इजा पोहोचवण्याचा कोणताही कट यशस्वी होऊ देणार नाही! ”मराठा समाजाने सरकारला इशारा देत म्हटले आहे की,
“कटात सामील असणाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा करावी.तसेच मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा तत्काळ द्यावी.अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांसाठी शासन जबाबदार राहील.”
समाजाचे ठाम मत आम्ही संघटित आहोत, जागरूक आहोत आणि खंबीर आहोत. मनोज दादा आमचे नेता नाहीत,ते आमचे प्रेरणास्थान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर परंडा तालुक्यातील सकल मराठा बांधवाच्या स्वक्षऱ्यां आहेत .