परंड्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधित सुपारीचा साठा जप्त

माझं गांव माझं शहर – परंडा | प्रतिनिधी

परंडा शहर आणि ग्रामीण भागात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारीच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहर व परिसरात शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित सुपारी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने विशेष मोहीम राबवत कारवाईचे नियोजन केले.

शुक्रवार, ५ जून रोजी पहाटेच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, पुणे, सोलापूर आणि धाराशिव येथील संयुक्त पथकाने परंडा शहरातील तसेच ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर अचानक छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिक आणि गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली.

कारवाईदरम्यान विविध नामांकित कंपन्यांचा सुगंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अनेक पोती व मोठा साठा प्रशासनाने जप्त केला. प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून संबंधित संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोधही प्रशासनाकडून घेतला जात आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून परंडा परिसरातील अवैध गुटखा विक्रीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट : अवैध धंदे करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

परंड्यातील या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

error: Content is protected !!