परंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडित तरुण आणि पोलीस कर्मचारी अशा दोन स्वतंत्र व्यक्तींच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली फिर्याद पीडित तक्रार तरुणाची विकास सुनील जगताप वय 29 यांच्या फिर्यादीनुसार, रोसा येथील महादेव संतोष नलवडे याने विकासच्या पत्नीच्या इंस्टाग्राम आयडीवर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ९ जून रोजी रात्री विकासने डोमगाव फाटा येथे महादेवला भेटून रिक्वेस्ट पाठवण्यास मनाई केली. याचा राग मनात धरून, त्याच रात्री गणेश संतोष नलवडे आणि त्याच्या तीन साथीदारांनी रोसा बसस्टॉप येथे विकासला गाठले. गणेशने विकासला शिवीगाळ करून कमरेला लावलेले पिस्तुल दाखवले आणि दोन दिवसात तुझा गेम करतोअशी जिवे मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी विकास जगताप यांनी पोलीस मदतीसाठी डायल ११२ वर फोन करून माहिती देऊन परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गणेश नलवडे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध धमकावल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद; पोलिसांची कारवाई दुसरी फिर्याद परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीकांत अरुण भांगे यांनी दिली आहे. डायल ११२ वर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, संशयित गणेश संतोष नलवडे याच्या घराच्या मागे गवतात लपवून ठेवलेली एक एअर पिस्तुल किंमत सुमारे २ हजार रुपये मिळून आली. गणेशने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने आणि त्याला त्याचे वडील संतोष नलवडे, आई शोभा संतोष नलवडे व भाऊ महादेव नलवडे यांनी या कृत्यासाठी अपप्रेरित केल्याने, या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ आणि बी.एन. एस. कलम ४९ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच घटनेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या या दोन स्वतंत्र फिर्यादींमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एक आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफो गजानन मुळे हे करत आहेत.
