धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू करत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
तुळजापूर येथील सौ. कविता प्रविण जगताप या ४ जून रोजी प्रसूतीसाठी धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तक्रारीनुसार, तपासणीदरम्यान बाळाचे वजन सुमारे चार किलो असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता लक्षात घेऊन कुटुंबीयांनी वारंवार सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली होती. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी “नॉर्मल प्रसूती होईल” असे सांगत वेळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ५ जून रोजी दुपारी प्रसूतीवेदना वाढल्यानंतर संबंधित महिलेला उपचारासाठी आत नेण्यात आले. त्यावेळी बाळाची प्रकृती व हृदयाचे ठोके सामान्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सिझेरियन करण्याऐवजी दोन पुरुष कर्मचाऱ्यांना बोलावून महिलेच्या पोटावर व पाठीवर दाब देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यास विरोध केल्यावर संबंधित डॉक्टरांनी महिलेला मारहाण केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा पीडित महिलेने आपल्या लेखी तक्रारीत केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक कारवाई म्हणून स्त्री रुग्णालयातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. स्वाती पांढरे यांनी दिली.
तथापि, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर लेखी आदेशाद्वारे कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
