सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात – तहसीलदारांच्या नावाने आर्थिक फसवणूक, मोठे रॅकेट – कारवाईला सुरुवात

धाराशिव – माझं गांव माझं शहर

शासकीय काम करून देतो असे म्हणत धाराशिवच्या तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणारा सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात अडकला आहे. निखिल रणखांब असे त्याचे नाव असुन त्याने रेशनकार्डसाठी धाराशिव तालुक्यातील मेंढा येथील अनेक लोकांकडुन प्रत्येकी 5 हजार गोळा करून आर्थिक फसवणूक केली. हा कार्यकर्ता दुसऱ्या कामासाठी एका मराठा संघटनेचे नाव सांगून तहसीलदार यांच्याकडे आला त्यावेळी डॉ जाधव यांनी त्याला पकडून बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले. महसूल व पोलिस विभाग पुढील कारवाई करीत आहेत.

रणखांब हा उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील रहिवासी असुन त्याने नुकतेच धाराशिव शहरात बस्तान बसवले होते. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासोबत असलेले सत्काराचे फोटो दाखवून माझे चांगले संबंध आहेत, तुमचे काम करून देतो असे म्हणत त्यांच्याकडुन पैसे उकळायचा. शासकीय अधिकारी यांना भेटून तो म्हणत असे मी समाजसेवा करतोय तुमचे शासकीय काम चांगले व प्रेरणादायी आहे. अधिकारी यांचा सत्कार करून फोटो काढुन तो मान प्रतिष्ठा असल्याचे दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक करीत असे.

मेंढा येथील काही नागरिकांना रेशन कार्ड काढुन देतो असे म्हणत निखिल रणखांब याने अनेक लोकांची फसवणूक केल्याची तक्रार मानव अधिकार संघटनेचे धीरज ढोरमारे यांनी बेंबळी पोलिसात केली, त्यानंतर तहसीलदार कार्यालयात याची माहिती दिली. हे दोघे त्याचा शोध घेत असताना रणखांब हा दुसरे एक काम घेऊन तहसीलदार डॉ जाधव यांच्याकडे आला व जाळ्यात अडकला. तहसीलदार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बेंबळी पोलिसांना बोलवून ताब्यात दिले.

तहसीलदार जाधव यांनी रणखांब याला चांगलेच खडेबोल सुनावले. जाधव यांनी त्याला जाब विचारला असता असता त्याने जाधव यांना अरेरावीची भाषा केली, जिल्हाधिकारी व माझे चांगले संबंध आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला दाखवतो. त्यानंतर जाधव यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. रणखांब याने मेंढा येथील लोकांकडुन पैसे घेतल्याचे कबुल करीत माफीनामा लिहून दिला.

रणखांब याने मेंढा गावातील धीरज बाबुराव ढोरमारे यांच्यासह अन्य लोकांकडुन पैसे घेतल्याचे मान्य करीत ते पैसे परत देण्याचे लेखी मान्य केले. रणखांब हा वैजिनाथ जावळे यासह गावातील अन्य एजन्ट सोबत संगणमत करून कट रचायचा व गोर गरीब लोकांकडुन पैसे लुटत असे. पैसे गोळा करण्यासाठी त्याने स्थानिक लोक / एजन्ट ठेवले होते त्यांच्या मार्फत पैसे गोळा केले जायचे. रणखांब जाळ्यात अडकल्याने त्याची टोळी हदरली असुन एक मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे..

काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते वरिष्ठ शासकीय अधिकारी याचा सत्कार करून त्यांच्याशी जवळीक असल्याचे दाखवून लोकांकडुन काम करण्यासाठी पैसे लुटत असल्याचे दिसते. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनासह नवीन रेशन कार्ड काढुन देण्यासाठी 5 ते 10 हजार घेत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. दरम्यान शासकीय कामासाठी कोणीही पैसे देऊ नये, कोणी पैसे मागत असल्यास तक्रार करावी असे आवाहन तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!