माझं गांव माझं शहर |धाराशिव, दि. २१ : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी ठेवत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. बदलत्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सक्षम शिक्षण मिळावे, यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या निर्णयाच्या मान्यतेसाठी आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत सेमी-इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या ऐतिहासिक निर्णयासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सभेदरम्यान विविध सदस्यांनी शिक्षकांचे समायोजन, शाळांचे एकत्रीकरण तसेच शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसंदर्भातील मुद्द्यांवर सखोल व सकारात्मक चर्चा केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपाध्यक्ष सौ. उषाताई गायकवाड यांच्यासह सर्व सभापती, प्रमुख अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
हा निर्णय केवळ शिक्षण पद्धतीतील बदल नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा देणारा आणि त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणारा ठोस टप्पा ठरणार आहे.
— माझं गांव माझं शहर | धाराशिव
