धाराशिव, दि. 2 जून : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना, जिल्हा धाराशिव यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 2 जून) दुपारी 12.30 वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोकराव मोहेकर होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील, अशोकराव पवार, दत्ता बंडगर, धनंजय पाटील, टिकले गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिकले सर यांनी केले.
बैठकीत खाजगी शिक्षण संस्था चालविताना संस्थाचालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या व प्रशासकीय अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन स्तरावर तसेच न्यायालयीन मार्गाने या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संस्थांच्या विविध प्रश्नांवर सरवदे सर, पांडुरंग लाटे सर, शिंदे सर, सौ. मुळे मॅडम यांच्यासह अनेक संस्थाचालकांनी आपली मते मांडली.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. आवश्यक असल्यास यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाने शिपाई पदे रद्द करण्याचा व सेवानिवृत्तीनंतर ती पदे नव्याने भरता येणार नाहीत अशी घातलेली बंदी अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिपाई ही शैक्षणिक संस्थेतील पायाभूत गरज असल्याने ही पदे कमी करण्याचा अधिकार शासनाला नसल्याचे सांगत याबाबतही न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला.
तसेच संस्थांमधील सेवानिवृत्त लिपिकांच्या जागी नवीन भरती करण्यावरील बंदी उठविणे, लिपिक पदभरतीस मान्यता मिळविणे, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न, तसेच संचमान्यतेतील विविध त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातील विद्यार्थी संख्येशी संबंधित अन्यायकारक अटी व शर्ती रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता प्रक्रियेमध्ये विद्यार्थी संख्येचे चुकीचे निकष, अपूर्ण वर्कलोड व इतर प्रशासकीय त्रुटींबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यातील कायम शब्द काढण्यात आलेल्या मात्र अद्याप मूल्यांकन न झालेल्या 12 प्राथमिक शाळांबाबत शासन स्वयंअर्थसहाय्यित करण्याचा किंवा बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी संघटनेने दर्शविली.
शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिव येथे संघटनेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला. तसेच न्यायालयीन लढ्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ही समिती जिल्हास्तरीय शैक्षणिक प्रश्नांवर मार्गदर्शन करून आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी मदत करणार आहे.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील मोठ्या संख्येने संस्था चालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहूराज लोमटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मार्गदर्शक ॲड. वसंतराव मडके यांनी केले.
