परंडा तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) मतांचे विभाजन होणार असून, याचा थेट फायदा कोणाला होणार?

परंडा (तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला त्यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच आव्हान दिले आहे. परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर धनंजय सावंत यांनी आपल्या समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

धनंजय सावंत यांच्या प्रतिक्रियेतील दाहक मुद्दे:

गरज संपली की नेत्यांकडून दुर्लक्ष: धनंजय सावंत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत आपली खंत व्यक्त केली. “कार्यकर्त्यांची गरज संपली की नेते त्यांना जुन्या चपलेसारखे सोडून देतात. माझीही गरज संपली असावी, म्हणूनच गेल्या १० महिन्यांपासून मला बोलावले गेले नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

हे वैयक्तिक बंड नाही: “हे काका-पुतण्यांमधील भांडण नाही, तर आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा लढा आहे,” असे सांगत त्यांनी अपक्ष लढण्यावर शिक्कामोर्तब केले.

परंडा तालुक्यात खिंडार: धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे तानाजी सावंतांच्या बालेकिल्ल्यात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या: आपण कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नसल्याचे सांगत त्यांनी तूर्त भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या बंडा मुळे परंडा तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) मतांचे विभाजन होणार असून, याचा थेट फायदा कोणाला होणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!