सोलापूर : पीक विमा, वंचित शेतकऱ्यांची भरपाई आणि सीना नदीत पाणी सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी

सोलापूर, दि. १३ मे : प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. पीक विमा नुकसान भरपाई, खरीप २०२३ मधील वंचित शेतकऱ्यांना विमा रक्कम आणि सीना नदीत भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०२५ मध्ये शासनाने कांदा, सोयाबीन, भुईमूग आणि तूर ही पिके पीक विम्यासाठी निर्देशित केली होती. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी विमा भरला असतानाही विमा कंपन्यांनी केवळ कांदा पिकालाच २५ टक्के विमा मंजूर करून इतर पिकांच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला.

विशेषतः उत्तर सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस होऊनही सोयाबीन उत्पादकांना विमा नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असल्याचे त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्या चुकीचे निकष लावून नुकसान भरपाई टाळत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

खरीप हंगाम २०२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आणि तांत्रिक कारणांमुळे विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप विमा रक्कम जमा झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देत आगामी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व शेती साहित्य खरेदीसाठी तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सीना नदीत भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धरणातून मोठा विसर्ग करण्यात आल्याने म्हाडा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत महापूरस्थिती निर्माण झाली होती. यात शेती, जनावरे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता उन्हाळ्यात सीना नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे अत्यावश्यक असल्याचे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बैठकीस उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, मनोज यलगुलवार, प्रवीण भोसले, अमोल सलवदे, विकास राठोड, पुष्कराज भोसले, चेतन इंगळे, सोमनाथ भोसले, दादासाहेब भोसले, बालाजी जगताप, रुकमा गुंड, हणमंत जावीर, दयानंद पवार, निलेश गुंड, विष्णू भोसले, संदीप सुरवसे, विशाल वाघमारे, हणमंतू जगताप, प्रदीप भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!