परंडा📌 उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; कामाच्या व्यापामुळे अधिकारी तणावाखाली रिक्त पदे भरण्याची मागणी

परंडा (तानाजी घोडके) येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. एकाच व्यक्तीला अनेक टेबलांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या कामांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी परंडा तालुक्यातील नागरिकांमधून जोर धरत आहे.
कामांचा डोंगर आणि मनुष्यबळाचा अभाव
परंडा उपभूमी अभिलेख कार्यालयांतर्गत जमिनीची मोजणी, पोटहिस्सा नकाशा, वारस नोंद आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येतात. मात्र, कार्यालयात कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक ज्युनिअर लिपिक दप्तर बंद अधीक्षक इतर शिपाई ४ एकूण ११ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असून, वाढत्या वर्कलोडमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांचे हाल
एकीकडे अधिकारी तणावाखाली असताना, दुसरीकडे शेतकरी आणि नागरिकांना साध्या कामासाठी अनेकदा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिसरात दलालांचा जास्त वावर आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत”वेळेवर मोजणी होत नाही आणि कर्मचारी विचारणा केली तर कामाचा ताण असल्याचे सांगतात,” अशी तक्रार नागरिक करत आहेत.

शासनाने लक्ष देण्याची गरज
या गंभीर समस्येकडे वरिष्ठ स्तरावरून लक्ष देऊन परंडा कार्यालयातील रिक्त जागा प्राधान्याने भराव्यात, जेणेकरून कामाचा खोळंबा थांबेल आणि अधिकाऱ्यांवरील मानसिक ताण कमी होईल. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी पाठपुरावा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

error: Content is protected !!