माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट; कृषीपूरक उद्योगांसाठीही स्वतंत्र आराखडा सादर
माझं गांव माझं शहर | सोलापूर / टेंभुर्णी प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेल्या एमआयडीसी पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रमुख नेतृत्वाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची टेंभुर्णी येथे समक्ष भेट घेतली. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा करमाळा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी सर्व संचालकांसह उद्योगमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या वेळी करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने करमाळा एमआयडीसीची दुरवस्था, पाणीटंचाई आणि तालुक्यातील कृषीपूरक उद्योगांच्या गरजांबाबत उद्योगमंत्र्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली.
“भूखंड विकले; पण पाणीच नाही”
निवेदनात करमाळा एमआयडीसीमधील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. एमआयडीसीतील बहुतांश भूखंडांची विक्री होऊनही पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध नसल्याने उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. परिणामी अनेक उद्योजकांचे गुंतवणूक प्रकल्प रखडले असून औद्योगिक विस्तार पूर्णपणे थांबला आहे.
शंभूराजे जगताप यांनी उद्योगमंत्र्यांना सांगितले की, “पाण्यासारखी मूलभूत सुविधा नसल्याने उद्योजक अडचणीत आले आहेत. एमआयडीसीचा विकास होण्यासाठी सर्वात आधी पाणीप्रश्न सोडवणे अत्यावश्यक आहे.”
‘मांगी धरणा’तून पाणीपुरवठ्याची मागणी
करमाळा एमआयडीसीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘मांगी धरणा’तून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही विनंती करण्यात आली.
तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
कृषीपूरक उद्योगांचा स्वतंत्र आराखडा
करमाळा तालुक्यातील ऊस व केळी उत्पादन लक्षात घेऊन कृषीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी स्वतंत्र “अॅग्रो-बेस्ड इंडस्ट्री” मॉडेल उद्योगमंत्र्यांना सादर करण्यात आले.
यामध्ये केळी प्रक्रिया उद्योग, आधुनिक कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग हाऊस, ऊसाच्या चिपाडापासून कागद व इथेनॉल निर्मिती उद्योग, तसेच ग्रामीण महिलांसाठी गारमेंट पार्क उभारण्याच्या मागण्यांचा समावेश होता.
याशिवाय तालुक्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के रोजगार प्राधान्य देण्यात यावे आणि त्यासाठी विशेष कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, अशीही मागणी करण्यात आली.
उद्योगमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मकतेने ऐकून घेतल्या. करमाळा एमआयडीसीच्या पाणीप्रश्नाबाबत मंत्रालयात तातडीने विशेष बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शंभूराजे जगताप यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या भेटीदरम्यान करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जगताप गटाचे कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सर्वपक्षीय स्तरावर एकजूट झाल्याचे चित्र या भेटीत पाहायला मिळाले. उद्योग मंत्रालयाच्या पुढील निर्णयाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
