पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचा हात
परंडा प्रतिनिधी | दि. २७ मे २०२६
परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम मंगळवारी (दि. २६) येथील विश्रामगृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे हे होते. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदत करण्यात आली.
यामध्ये भगवंत मेडिकल, सिरसाव यांना २ लाख रुपये, शिवराज मेडिकल, चिंचपूर (खुर्द) यांना ८५ हजार रुपये तसेच एम.एस. मेडिकल, ढगपिंपरी यांना १ लाख १३ हजार रुपयांचे धनादेश देऊन मदतीचा हात देण्यात आला. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांना या मदतीमुळे दिलासा मिळाला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांनी केमिस्ट बांधवांनी व्यवसायात पारदर्शकता राखून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन केले. “औषध व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. संघटनात्मक एकजूट कायम ठेवत सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मन्नान बासले, फैझल दहलूज, तालुका प्रतिनिधी असिफ सय्यद, तालुकाध्यक्ष विकास जगदाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण मुंढे, गजानन साळुंके, गणेश टकले, अन्वर शेख, दिपक ठाकूर, सादिक गणेचारी, राजेश ठक्कर, आनंद केसकर, इलियास बागवान, अवेज शेख, विष्णू भिसे, तेजराज गर्दळे, महेश ननवरे, जयराम डाकवले, महेश घाडगे, रियाज हन्नुरे, आरिफ सय्यद, अमित शेरखाने, रवि राष्ट्रपाल, अभय मस्के, पिंटू काकळे, यशवंत शिंदे, पाशा शहाबर्फीवाले, दिपक मोरे, रामदास सांगळे, नागेश सांगळे, केदार चोबे, शाम सांगळे, दिपक वाघ, अभिजित शेरखाने, सहदेव हिवरे, तुषार बागल, ज्ञानेश्वर भानवसे, अमोल कारले, आकाश पराडे, दत्तात्रय कदम, जोतिराम चोबे आणि जाफर शेख उपस्थित होते.
