बनावट अपंग प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी; पुण्यातील तरुणी अटकेत

पालघर | प्रतिनिधी

बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून जिल्हा परिषदेने तिची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील रुपाली टेंगळे हिने ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केला होता. अर्जासोबत तिने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दिलेले श्रवणदोष असल्याचे अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे तिची निवड होऊन पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती.

सुरुवातीला संबंधित प्रमाणपत्र वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र राज्यभरात बोगस अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ आणि नोकऱ्या मिळवणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांबाबत गंभीर संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

या कारवाईमुळे बनावट अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या व विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून, अपंग प्रवर्गातील जागांवर गैरप्रकार करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या निमित्ताने राज्यातील अपंगत्व प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!