परंडा, प्रतिनिधी : आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे दि.१३ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प.स.सभागृह परंडा येथे संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. शाळांची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचे हित जोपासणे तसेच प्रवेशसंख्या वाढवून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी शिक्षकांनी नियमित व वेळेत शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन द्यावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच पालकांशी सातत्याने संपर्क ठेवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा प्रशासनाच्या वतीने वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही बैठकीत देण्यात आली.
बैठकीस पंचायत समिती सभापती अर्चनाताई जाधव, अण्णासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य गणेश भिल्लारे, सूर्यभान हाके (गटशिक्षणाधिकारी), तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण व शंभर टक्के प्रवेश अभियान यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
