धाराशिव(प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ म्हशी जप्त करून २ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, पिकअप व हिरो स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.
दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी मोघे लासोना, शिवराई येथील एका शेतकऱ्याच्या ७ म्हशी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मा. श्रीमती ऋतु खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे नेमकूर बीड येथील एका संशयित इसम व वाहन याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार चंद्रकांत जगन्नाथ ननवरे (रा. ननवरे वस्ती, नेमकूर, ता. जि. बीड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) याच्यासह विविध ठिकाणी जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी घाटेवाडी, लासोना, बेंबळी, कोड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवी माळी, सुरतगाव, वेगा, माकणेश्वर शिवर आदी परिसरांतून म्हशींची चोरी केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ८ म्हशींसह पिकअप वाहन व दुचाकीचा समावेश आहे.
तपासात आरोपींनी धाराशिव जिल्ह्यातील एकूण १३ म्हशी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस सध्या आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेत असून, पुढील तपास पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक ऋतु खोकर आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शफकत आमान यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि सुदर्शन कासार, पो.हे शेखर पाटील, पो.हे प्रकाश औताडे, पो.हे जावेद काझी, पो.हे फराजान पठाण, चापोहे रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांचा समावेश होता.