धाराशिव, माझं गांव माझं शहर : शहरातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत हॉटेलच्या मुख्य शाखेची कसून तपासणी केली. या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या चार सदस्यीय पथकाने मातोश्री बिर्याणी हाऊसच्या मुख्य शाखेला भेट देऊन स्वच्छता, अन्न साठवणूक, स्वयंपाकघरातील परिस्थिती तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन याची सविस्तर तपासणी केली. यावेळी बिर्याणीचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.प्राथमिक तपासणीनंतर संबंधित अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सहआयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करत हॉटेल मालकाला अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.नमुना तपासणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
धाराशिवातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
