नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय सेवेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पांडुरंग सुलनबाई व्यंकट माने यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली असून त्यांनी नांदेडकर नागरिक, सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांचे आभार मानत भावनिक शब्दांत निरोप दिला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये पदोन्नतीवर नांदेड येथे रुजू झाल्यानंतर तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. याच काळात नांदेड पोलीस दलासमोर उभ्या राहिलेल्या बियानी हत्याकांडासह अनेक गंभीर आणि आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यातील गँगवॉर, संघटित गुन्हेगारी तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी संबंधित प्रकरणांवर काम करताना पंजाब, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत जाऊन कारवाया केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांविरोधात प्रभावी कारवाया करण्याची संधी मिळाल्याचे सांगत माने यांनी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. जानेवारी 2024 मध्ये त्यांची सोनखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. स्थानिक गुन्हे शाखेतील दीर्घ अनुभव असला तरी पोलीस ठाण्याचे नेतृत्व करणे हे नवे आव्हान होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 28 महिने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
विशेष म्हणजे, नांदेड परिक्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांच्या मासिक रँकिंगमध्ये सोनखेड पोलीस ठाण्याने तब्बल 15 महिने प्रथम क्रमांक कायम राखला. ही कामगिरी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनखेड परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबवत 12 गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक युवकांनी दारूचे व्यसन सोडून नव्याने संसार उभारण्यास सुरुवात केली. आंबे सांगवी आणि लोंढे सांगवी या गावांतील युवकांनी मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून त्यांना प्रतिष्ठेचे डीजी इन्सिग्निया पदक प्रदान करण्यात आले होते.
31 मे 2026 रोजी त्यांची नांदेडहून लातूर येथे बदली झाली. 2 जून रोजी त्यांनी लातूर येथे हजेरी लावली असून 3 जून रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी त्यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथे केली.
आपल्या निरोप संदेशात माने यांनी माजी व विद्यमान वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामरक्षक दल, सरपंच, तंटामुक्ती समिती सदस्य तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले. विशेषतः चांगल्या कामांचे कौतुक आणि त्रुटींवर वेळोवेळी लक्ष वेधणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी कौतुक केले.
“नांदेड जिल्ह्याने मला एक सक्षम प्रभारी अधिकारी म्हणून ओळख दिली. येथील नागरिकांचे प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मी कधीही विसरणार नाही. भविष्यात पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे,” अशा शब्दांत एपीआय पांडुरंग माने यांनी नांदेडकरांचा निरोप घेतला.
— पांडुरंग माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.
