बसवराज पाटील यांचा दमदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीत मतभेद नसल्याचा दावा

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर भव्य रॅली आणि शक्तीप्रदर्शन करत बसवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी बाबासाहेब पाटील, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, सुरेश धस आणि अर्चनाताई चाकूरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बसवराज पाटील यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. “माझी उमेदवारी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या एकमताने निश्चित करण्यात आली आहे. कोणतीही नाराजी नसून सर्व नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेषतः दत्ता कुलकर्णी आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू सुजितसिंह ठाकूर यांची नावे चर्चेत होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी बसवराज पाटील यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आले होते.

याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बसवराज पाटील यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत पक्षात कोणताही असंतोष नसल्याचा दावा केला. “सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करत आहेत. पक्षाच्या निर्णयाचा सर्वजण सन्मान करत आहेत,” असे ते म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विजयाचा दावा केला. “धाराशिव, लातूर आणि बीड या तीनही जिल्ह्यांत महायुतीची ताकद भक्कम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा आम्हाला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे विजय महायुतीचाच होईल,” असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, महायुती आणि विरोधकांमधील लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!