माझं गांव माझं शहर | परंडा
परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मुख्य मार्ग असलेल्या ‘मंडई पेठ’ परिसरातील अतिक्रमण हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, आता त्या ठिकाणी नालीच्या खोदकामालाही सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मंडई पेठ हा भाग शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर मानला जातो. अनेक वर्षांपासून या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण वाढत असल्याने नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचून दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होत होती.
या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. प्रशासनाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवून नालीसाठी खोदकाम सुरू केले आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी इरफान शेख, जावेद पठाण यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिक आणि नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मार्ग अधिक मोकळा आणि सुस्थितीत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच शहराच्या विकासासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
