परंडा तहसील कार्यालयात उत्पन्न प्रमाणपत्रांबाबत मोठा गोंधळ; नागरिकांमध्ये संताप

परंडा | प्रतिनिधी :- परंडा तहसील कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. विशेषतः सुमारे २१ हजार उत्पन्न प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत अनियमितता आणि विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, विविध भरती प्रक्रिया तसेच सामाजिक योजनांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र अत्यावश्यक असताना नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. अनेक अर्जदारांचे अर्ज प्रलंबित असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ऑनलाइन अर्ज सादर करूनही प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनावश्यक विलंब होत असून, कार्यालयातून स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शेतकरी वर्गामध्ये संताप वाढत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होऊनही संबंधित अधिकारी मौन बाळगत असल्याचा आरोप होत आहे.

या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेणार का?, तसेच संबंधित प्रक्रियेची चौकशी करून नागरिकांना दिलासा देणार का, याकडे तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित उत्पन्न प्रमाणपत्रांची प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करावी, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!