माझं गांव माझं शहर | ऐतिहासिक परंडा किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर आज परंडा नगरपरिषदेने मोठी धडक कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला. कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेला मार्ग अखेर खुला झाला आहे.
परंडा किल्ला हा जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हातगाडे, पानटपऱ्या आणि इतर अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून पर्यटकांना चालणेही कठीण झाले होते.
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा तसेच नागरिकांच्या सोयीचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. आज दि.१५ मे रोजी सकाळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाईला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.
काही ठिकाणी किरकोळ वाद घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. प्रशासनाने सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवून किल्ल्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे मोकळा केला.
नगरपरिषदेच्या या धाडसी आणि निर्णायक कारवाईचे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांकडून स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशाच प्रकारे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
