परंडा एस.टी. आगारात सवलत कार्ड वाटपात गोंधळ : एजन्सी प्रतिनिधी गैरहजर, नागरिकांचा संताप

परंडा, दि. १२ (माझं गांव माझं शहर) : परंडा येथील एस.टी. आगारात नागरिकांसाठी सवलत कार्ड वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्यामुळे अनेक वयोवृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

सवलत कार्ड मिळवण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी एस.टी. आगारात गर्दी केली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्ड वितरणासाठी नियुक्त एजन्सी प्रतिनिधी लांडगे , मुजावर वेळेवर उपस्थित नसल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली. यामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना उन्हात उभे राहून त्रास सहन करावा लागला. काहींनी तर वैतागून घरी परतण्याचा मार्ग स्वीकारला.

याशिवाय, सवलत कार्डासाठी ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त दर आकारले जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. काही एजन्सीशी संबंधित व्यक्ती व कंपन्या नागरिकांकडून अवाजवी पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जेष्ठ नागरिक व महिलांनी आगार व्यवस्थापक बालाजी मुळे यांच्याकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “कार्ड वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत व्हावी, एजन्सी प्रतिनिधी वेळेवर उपस्थित राहावेत, तसेच वाढीव दर घेणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

दरम्यान, या प्रकारामुळे एस.टी. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!