परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या ५% निधीतून एकूण ₹३,७४,४०० रुपयांचे वाटप शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले. मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध गरजा लक्षात घेऊन हा निधी वितरित करण्यात आला असून, यामध्ये सहाय्यक साहित्य, उपजीविकेसाठी आवश्यक साधने तसेच इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक मदत देण्यात आली. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी नगरपालिकेचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी प्रशासनाकडे मांडली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या निधी वाटपामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने भविष्यातही अशा योजनांद्वारे दिव्यांगांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.
लाभार्थ्यांना ऑनलाईन neft द्वारे वाटप करण्यात आले कार्यक्रमावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग संघटना शहर प्रमुख गोरख देशमाने व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग बांधवांनी नगरपालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले.