बावची येथील ऑट्रॉसिटी प्रकरण : आरोपी रामचंद्र थिटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, परंडा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नेमके प्रकरण काय?
दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेताशेजारी आरोपीची जमीन आहे. २६ मार्च रोजी जातीय द्वेषातून आरोपीने सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. तसेच, “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परंडा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन घडामोडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोगता ॲड. गाडे, ॲड. निकाळजे व ॲड. बी. बनसोडे यांनी युक्तिवाद मांडला.

तात्काळ अटकेची मागणी
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर फिर्यादी उमेश सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने पीडित कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
आता परंडा पोलीस आरोपीला कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!