परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत नगरपरिषदेची तात्काळ विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. परंडा शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची ही प्रलंबित मागणी असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्मारकाची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी नगरपरिषदेची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जनशक्ती नगर विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरपरिषद प्रशासनाने या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.