धाराशिव मध्ये ७ अपक्षांची माघार; बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख अशी थेट लढत.

धाराशिव (तानाजी घोडके) : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले आहे. रिंगणात असलेल्या ९ उमेदवारांपैकी ७ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक थेट महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रंगणार आहे.

महायुतीकडून भाजपचे माजी मंत्री बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख हे दोन प्रमुख उमेदवार मैदानात उरले आहेत. अंतिम दिवशी बंडखोरीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली असून निवडणूक सरळ दोन प्रमुख आघाड्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्चना विनोद गंगणे, अहमद राज सय्यद, मिलिंद गणपती महालिंगे, शरद रामभाऊ यादव, सचिन भारतराव पवार, सहाल बिन आमेर चाउस आणि संजय पांडुरंग मुंदडा या सात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

निवडणुकीसाठी मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत मतदारसंख्येत १७ ने घट झाली आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका रखडल्याने तेथील मतदारसंख्या कमी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

मतदारसंख्येचा विचार करता लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील ३६७, धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ३१७ आणि बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ३०४ असे एकूण ९८८ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

विशेष म्हणजे दोन्ही प्रमुख उमेदवार मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असल्याने या निवडणुकीकडे स्थानिक पातळीवर विशेष लक्ष लागले आहे. ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून मराठवाड्यातील आगामी राजकीय समीकरणांची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रत्येक मतासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, आता २२ जूनच्या निकालाकडे धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!