📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावची शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, शेजारील शेतकरी रामचंद्र विक्रम थिटे यांनी वारंवार सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइनची तोडफोड केली होती. याआधीही पाइपलाइनचे जॉईंट, कॉक व अन्य सिंचन साहित्य तोडून नुकसान केल्याचे प्रकार घडले असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

दि. २६ मार्च रोजी सोनवणे शेतात गेले असता बोरवेलमधून पाणी येत नसल्याचे आढळले. पाहणी केली असता बोरचे पाइप, वायर व दोरी तोडण्यात आली होती तसेच बोरमध्ये दगड व माती टाकून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, आरोपी नुकसान करून पळून जात असताना सोनवणे यांनी स्वतः पाहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी आरोपीकडे जाब विचारला असता, “माझ्या शेताशेजारी शेत घेण्याची तुझी लायकी नाही, तुला इथे शेती करू देणार नाही,” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ व धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच “इथे अठरा पगड जाती जमा झाल्या आहेत, त्यांना हाकलून लावणार,” असे संतापजनक वक्तव्य केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी बावची येथील रामचंद्र विक्रम थिटे यांच्याविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २६ मार्च) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एका दलित शेतकऱ्याच्या शेती, पाणी आणि उपजीविकेवरच घाला घालण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

सदर प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!