धाराशिव : विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालय धाराशिवच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनांमधील लाभार्थ्यांना विविध योजनांचा व सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय २७ जून २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे.
तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार : धाराशिव तालुक्यातील काही दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप UDID कार्ड सादर केलेले नाही. तसेच काही लाभार्थ्यांकडे केवळ ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा प्रमाणपत्राची मुदत संपलेली आहे. अशा सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन पद्धतीने UDID कार्ड काढून त्याची छायांकित प्रत व आधार कार्ड संबंधित ग्रामसेवक किंवा अधिकाऱ्यांकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना अव्हाहन : यासोबतच धाराशिव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना याबाबत माहिती देऊन त्यांना मदत करावी तसेच जनजागृती करावी, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी नागरिकांना आणि संबंधित लाभार्थ्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळू शकेल.