परंडा तहसील कार्यालय प्रशासकीय कामांसाठी ‘ओस’; निवडणूक ड्युटीमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग वाऱ्यावर..!

परंडा (तानाजी घोडके) सध्या परंडा तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर (Election Duty) असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसभर ताटकळत थांबूनही कामे होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे. प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक कामाला न लावता, टप्प्याटप्प्याने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.


नागरिकांची ससेहोलपट :- तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग विविध दाखले, सात बारा , नक्कल , महसूल पुरावे इ. कामे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी परंडा तहसील कार्यालयात येत आहेत. मात्र, कार्यालयात गेल्यावर “अधिकारी निवडणूक ड्युटीवर आहेत” असे उत्तर त्यांना मिळत आहे. सकाळपासून दुपारपर्यंत थांबूनही साधे अर्ज स्वीकारायलाही कोणी नसल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
टप्प्याटप्प्याने ड्युटी लावण्याची मागणी:
निवडणुकीचे काम महत्त्वाचे असले तरी, दैनंदिन प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणे चुकीचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक कामात गुंतवण्याऐवजी, त्यांची विभागणी करून काही कर्मचाऱ्यांना कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून जनतेची महत्त्वाची कामे अडकून राहणार नाहीत.
प्रशासनाने दखल घेण्याची गरज:
दूरवरून येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे. किमान अत्यावश्यक कामांसाठी तरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परंडा तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.

error: Content is protected !!