देवगाव (बु) येथील वाघीणगड निवासस्थानी सुरू असलेले उपोषण स्थगित- मांगले

परंडा दि. १८ (तानाजी घोडके) राजकारणाच्या रंगमंचावर कधी कधी असे क्षण येतात, जे फक्त एका उमेदवाराचा निर्णय नसतो, तर तो लोकभावनेचा, मूल्यांचा आणि नात्यांचा आरसा ठरतो. अशाच एका क्षणाचा साक्षीदार ठरला परंडा-शेळगाव सर्कल!

   जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष म्हणून घोषित झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष एकाच नावावर थांबले होते  दिनेश रोहिदास मांगले. यांची प्रामाणिकतेची ओळख, समाजसेवेची निष्ठा आणि जनतेशी जिव्हाळ्याचं नातं ; या सर्व गुणांमुळे मांगले हे “जनतेचा उमेदवार” ठरत होते.परंतु अचानकच त्यांनी जाहीर केलं, “मी आगामी निवडणूक लढणार नाही.” या एका वाक्याने संपूर्ण सर्कल हादरला. ज्यांच्या नावाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली होती, त्या मांगले यांच्या निर्णयाने कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही हा निर्णय पराभवाचा नव्हता ; तो होता सत्तेपेक्षा सेवेला प्राधान्य देणाऱ्या विचारांचा विजय

या निर्णयाने व्यथित झालेल्या कार्यकर्त्यांनी मांगले यांच्या देवगाव (बु) येथील वाघीणगड निवासस्थानी उपोषण सुरू केलं. शनिवारी सकाळी १० पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग अमरण उपोषणात
जेकटेवाडी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खामकर, जॉकी शिंदे, दत्ता आरे यांचा सहभाग होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक जमले. ही बातमी कळताच, दिनेश मांगले पुण्यावरून ताबडतोप उपोषण स्थळी दाखल झाले. आपल्या साठी कार्यकर्ते अन्नत्याग करत आहेत हे समजल्याने त्यांनीही अन्न व पाणी त्याच क्षणी त्यागलं!

   मांगले रात्री ८ वाजता पुणे येथून उपोषणस्थळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुरू झाला. रात्रभर चर्चा, भावनिक संवाद आणि अश्रूंनी भरलेले क्षण ; हे दृश्य फक्त एका राजकीय चळवळीचं नव्हतं, तर एक कुटुंबीय बंधाचं होतं.अखेर मांगले यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत त्यांना शांत केलं.

   उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. पण या घटनेने शेळगाव सर्कलमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली. राजकारण फक्त सत्तेसाठी नसतं; ते नात्यांचं, विचारांचं आणि लोकसेवेचं माध्यम असतं.

विशेष म्हणजे दिनेश मांगले यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना कोणत्याही पक्षाचा वरदहस्त. ते फक्त लोकांच्या प्रेमावर, विश्वासावर आणि स्वतःच्या कार्यावर उभे आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे
ते पुढे काय भूमिका घेतात,की कार्यकर्त्यांची समजूत काढून समाजकार्याचा प्रवास कायम ठेवतात, याकडे संपूर्ण शेळगाव सर्कलसह परंडा तालुक्याचे डोळे लागले आहेत.

error: Content is protected !!