माझं गांव माझं शहर | परंडा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परंडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या भीम जयंती महोत्सवात भीमगीतांचा दणदणाट होत, संपूर्ण शहर भीममय झाले. शिंदेशाहीचा गजर आणि भव्य महासंगीत सोहळ्यामुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करत उपस्थित मान्यवरांनी सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या प्रेरणेतून जिल्हाभर भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिंदेशाहीतील ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल आवाजात सादर झालेल्या भीमगीतांनी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. त्यांच्या गायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली आणि भीम अनुयायांनी जल्लोषात सहभाग घेतला.
जोश, उत्साह आणि अभिमानाने भरलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना जागृत झाली.
कार्यक्रमास मा. श्री. सुजितसिंहजी ठाकूर, श्री. धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती श्री. विश्वास कोकणे, उपनगराध्यक्ष श्री. समरजीत ठाकूर, श्री. गौतम लटके, श्री. राहुल बनसोडे तसेच महायुतीचे जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
