माझं गाव माझं शहर | परंडा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील तब्बल २१ कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः ‘सलाईनवर’ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
माहितीनुसार, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले असून परंडा येथील कर्मचारीही त्यात सहभागी झाले आहेत. यामध्ये जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी, रिक्त पदे भरणे, पदोन्नती, तसेच सेवाशर्तींमध्ये सुधारणा यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनामुळे रुग्णालयातील दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले असून, विशेषतः बाह्यरुग्ण विभाग व इतर सेवा यावर परिणाम जाणवत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर, रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था करत सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
